सोलापूर - वीस लाख रुपयांचे लोन मंजूर करून देतो, त्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी थाप मारत एका अनोळखी भामट्याने गुगल पे द्वारे 84 हजार 750 रुपये फसवणूक करत रक्कम उकळली असल्याचा गुन्हा जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सतीश वसंत शिर्के (वय 48 रा. दंगे, रेसिडेन्सी, शेळगी सोलापूर) या किराणा दुकानदाराची फसवणूक झाली आहे.
तक्रारदार सतीश शिर्के यांचे शेळगी (सोलापूर) येथे किराणा दुकान आहे. व्यवसायासाठी रक्कम लागणार होती.15 ऑगस्ट रोजी सतीश शिर्के यांना सकाळी 11.30 वाजता एक अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. मुद्रा लोनची स्कीम चालू आहे, आपणास लोन पाहिजे का, अशी विचारणा अनोळखी भामट्याने केली. त्यावर विश्वास ठेवत सतीश यांनी लोन पाहिजे असे उत्तर दिले.
त्या भामट्याने किराणा दुकान चालकाचा विश्वास संपादन करून, वीस लाखांचे लोन मंजूर होईल, त्यासाठी 84 हजार 750 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी थाप मारली. तसेच सतीश शिर्के यांनी, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक अनोळखी भामट्याच्या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवले. सर्व कागदपत्रे व्हाट्सएपवर घेऊन काही तासांतच उत्तर दिले की, तुमचे वीस लाख रुपयांचे लोन मंजूर झाले आहे. लवकरात लवकर प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असा तगादा लावला. किराणा दुकान चालक सतीश शिर्के यांनी गूगल पे द्वारे 84 हजार 750 रुपये भामट्याच्या बँक खात्यावर भरले.