सोलापूर- उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेतील सोलापूर शिवसेने अंतर्गत नाराजी अद्याप कायम असून ती 'फ्लेक्स वॉर'च्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅटर्नला धक्का बसला होता. यानंतर त्यांच्याविरोधात सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सोलापुरातही तानाजी सावंत यांच्या विरोधात खेकडा असल्याचे फ्लेक्स झळकले.
तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनीही विरोध दर्शवला होता. मंत्रीपदावरून तानाजी सावंत यांच्यासाठी लॉबिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांची सेनेतून हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पक्ष नेतृत्वात बदल करून शहर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीनंतर नवीन वादाला तोंड फुटले. शहरात त्यांच्या समर्थकांनी 'कोण आला रे कोण आला, तुमच्या सगळ्यांचा बाप आला' या आशयाचे फ्लेक्स लावले. त्यामुळे जिल्हा शिवसेनेतमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे.
याप्रकरणी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात तसेच शिवसेनेचे आमदार असलेल्या तानाजी सावंत यांच्यावर कारवाई होते का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. पुरुषोत्तम बरडे यांच्या निवडीनिमित्त सुरू झालेली ही गटबाजी कोणत्या वळणावर येते, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.