सोलापूर - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह परिसरात मंगळवारी दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच घरातील कुंड्यांही फोडल्या. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून, सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर न उतरता सोलापूर संभाजी ब्रिगेडने ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निषेध नोंदवला. या निवदेनात संभाजी ब्रिगेडने, मुंबई येथील राजगृहावरील हल्ला हा शिव-शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर केलेला हल्ला असून सदर हल्ला करणार्यांची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणून राजगृहाची ओळख संपूर्ण जगाला आहे. हा हल्ला हा केवळ वास्तूवरील हल्ला नसून तो ज्ञान भांडारावरील हल्ला आहे, असे आम्ही मानतो. असा हल्ला विकृत मानसिकतेचे द्योतक आहे. या हल्ल्यातील विकृत हल्लेखोरांचा गांर्भीयाने शोध घेऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी आणि आरोपींच्या या विकृतीमागे कोण आहे याचा शोध घेऊन, त्या संबंधितांनाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.