सोलापूर : काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने सोलापुरातील काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस भवनात अशा घटना नवीन नाहीत. यापूर्वीही हाणामारी, शिवीगाळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान हा वाद झाला. सध्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काँग्रेस कमिटीचे स्थानिक नेते या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत होते, मात्र, या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.
'या' कारणामुळे झाली हाणामारी : रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी काँग्रेस भवनात जमले होते. अभिवादन करून आमदार प्रणिती शिंदे बाहेर आल्या, तेव्हा फोटो काढण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील बंदपट्टे, सुभाष वाघमारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे दिसून आले.