सोलापूर -शहरासह 30 गावांमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरात बसा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, काही नागरिक या लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस मात्र या बेशिस्त नागरिकांना काठ्याचा महाप्रसाद देत आहेत. तसेच गल्ली बोळात जाऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये शहर पोलीस दलाच्यावतीने 2 हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आहे. 12 एप्रिलपासून आजतागायत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जवळपास 5 हजारांच्या पुढे रुग्ण संख्या गेली आहे. झोपडपट्टी भागातून शिरकाव करून कोविड-19 विषाणूने आता उच्चभ्रू सोसायटीमध्ये थैमान मांडले आहे. ही साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.