सोलापूर - आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथून मुंबईकडे जात असलेले सहा किलो सोने ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. ही कारवाई सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या सावळेश्वर टोल नाक्यावर झाली. यामध्ये पोलिसांनी दोन संशयीत व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. सोन्याचे अधिकृत पुरावे न मिळाल्यास गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
दोघे व्यक्ती हे सोने घेऊन मुंबईकडे जात होते. सावळेश्वर टोल नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावला होता. पक्की खबर असल्याने पोलिसांनी महामार्गावर अचूकरित्या चार चाकी वाहन अडवून तपासणी सुरू केली. यावेळी सुरुवातीला कारमधील संशयितांनी उडवाउडावीचे उत्तरे दिले. कसून तपासणी केली असता, पोलिसांना चालकाच्या सीट खाली एक लॉकर दिसले. त्यातून पोलिसांनी सोने बाहेर काढले.
3 कोटी 16 लाख 35 हजार 649 रुपयांचे सोने -
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चालकाच्या खाली असलेल्या लॉकरमधून सहा किलो वजनाची सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा तस्करीच्या बाजारात याची किंमत जवळपास 3 कोटी 16 लाख 35 हजार 649 रुपये आहे.