सोलापूर -सोलापूर शहरात असलेल्या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे नेहमी घडतात. याबाबत संबंधित तक्रारदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. पोलीस प्रशासन फक्त तक्रारी घेत नसून हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी देखील सदैव तत्पर आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल विभागाने तांत्रिक बाबींचा अवलंब करून चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध लावला आहे. सर्व मोबाइल हस्तगत केले आहे. जवळपास 6 लाख 22 हजार रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे.
'कोरोना महामारीचा संसर्ग असल्याने कार्यक्रम न घेता मोबाईल परत दिले जाणार आहे'
पोलीस आयुक्तालयातर्फे सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे मोठे कार्यक्रम घेऊन संबंधित मोबाइल मालकांना मोबाइल परत दिले जात होते. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम न घेता, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून मोबाइल परत देणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले आहे.