सोलापूर- एसटी स्टँड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्यांचा गुन्हे शाखेने तपास लावला आहे. एसटी स्टॅंडमधील चोरी, नवी पेठ येथील चोरी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी अशा तीन चोऱ्या गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत. तर 94 ग्रॅम सोने, 4 मोबाईल व 157 ग्रॅम चांदी असा एकूण 2 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चार संशयित चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांना जेरबंद केले आहे.
हेही वाचा -भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्याने मृत्यू
तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी..
20 ऑक्टोबरला नवी पेठ येथे एका महिलेची दुचाकी व पर्स लंपास केली होती. यात सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा 84 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल गेला होता. ही चोरी करणाऱ्या ओंकार चाकोते याला 84 हजार 100 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला भाग्यश्री वेताळ ही महिला तिच्या लहान मुलासोबत प्रवास करत होती. तिच्या मुलाच्या हातात असेलेली तिची पर्स चोरट्यांनी लांबवली. ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.
भर गर्दीत झालेल्या प्रकरणांचा तपास करत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ यांनी चोरांना ताब्यात घेतले आहे. सतीश दत्ता जाधव याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचा ऐवज, मोबाइल असा एकूण 1 लाख 91 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इतरही दोन चोरांना गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. महंमद आलम रफिक कुरेशी व लक्ष्मी शिवाजी भोसले या दोघांना अटक करून 11 हजार रुपयांचे दोन मोबाईल हस्तगत केले आहे.