महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2020, 9:37 AM IST

ETV Bharat / state

अकलूजमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात यश; 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लॉकडाऊनच्या काळात अकलूजमधील संग्रामनगर येथे मोठी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Police
सोलापूर पोलीस

सोलापूर -अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अतुल गांधी यांची घरोफोडी झाली होती. 27 मे ते 8 जून 2020 या कालावधीत ही घरफोडी झाली होती. यामध्ये 35 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 25 हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत गांधी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास लावला आहे. यामध्ये भैय्या शिंदे (राबाभूळगाव,ता माळशिरस), अमोल काळे(रा शिराळा,ता.माढा), किरण काळे (रा शिराळा,ता माढा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.

माहिती देताना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते

अकलूज बसस्थानकावर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे अकलूज व टेंभूर्णी मार्गावर पेट्रोलिंग करत असताना त्यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. अकलूजच्या संग्रामनगर येथे घरफोडी करणारे दोघे संशयीत चोरटे चोरीमधील मुद्देमाल विक्री करण्यासाठी अकलूज येथील जुन्या बसस्थानकाजवळ येणार, अशी ही माहिती होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अकलूज येथील जुन्या बस स्थानकाजवळ सापळा लावला. त्या ठिकाणी तीन व्यक्ती दुचाकीवरून सोने विक्रीसाठी आल्या. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसस्थानकावरून या आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडावीची उत्तरे दिली. शेवटी पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी चार साथी दारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल

चोरीला गेले 35 तोळे सोने, सापडले फक्त 12.7 तोळे -

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांकडून सोने, रोख रक्कम आणि दुचाकी वाहने असा 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 35 तोळे सोने चोरीला गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये 12.7 तोळे सोने आहे. तसेच काही चांदीच्या वस्तू देखील जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, शाम बुवा, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान,बिरुदेव पारेकर, परशुराम शिंदे,लाला राठोड ,मोहिनी भोगे,केशव पवार,अजय वाघमारे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details