सोलापूर: आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. तरीही या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द या गावची लोकसंख्या साधारण 3 हजारपर्यंत असेल. या गावामध्ये 1 हजार 500 मतदार आहेत. तर सात ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदची शाळा आहे. इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग या शाळेत आहेत. शाळेचा पट 70च्या आसपास आहे, पण शिक्षक मात्र एकच आहे. एकाच शिक्षकावरती संपूर्ण शाळेचा डोलारा गेल्या अनेक वर्षापासून उभा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर खुर्द या शाळेला गेल्या काही वर्षांपासून पुरेसे शिक्षक नाहीत. ग्रामपंचायत आणि पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षक द्यावा याची मागणी केली. परंतु मागणी करुनही शाळेला शिक्षक देण्यात आले नाहीत. शिक्षण विभाग मागणीची दखल घेत नसल्याने गावातील महिला सरपंचबाईंनी हातात खडू आणि पुस्तक घेऊन मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. एकबाजुला गावाचा कारभार आणि दुसऱ्या बाजुला शिक्षिकेची भूमिका आरती अजय कांबळे या उत्तमपणे संभाळत आहेत.
सरपंच पद आणि शिक्षण: आपल्या गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्या स्वतः पुढे आल्या. घराची जबाबदारी आणि गावची जबाबदारी सांभाळत, त्या शाळेतील मुलांना शिकवू लागल्या आहेत. आरती कांबळेंसह एक शिक्षक आप्पा सवईसर्जे, स्वयंसेविका प्रांजली महेश मस्के हे जिल्हा परिषदेच्या मुलांना ज्ञानाचे धडे देत आहेत. सरपंच अंजली कांबळे ह्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये शिकवतात. डिसेंबर 2022 मध्ये सलगर बुद्रुकच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत आरती अजय कांबळे सरपंच झाल्या. आरती यांचे शिक्षण पदवीपर्यंतचे झाले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व माहिती आहे. सरपंच झाल्यानंतर गावच्या कारभाराची सूत्रे त्यांच्या हाती आली. आरती कांबळे यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गावातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत. त्यासाठी आरती कांबळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जात असायच्या. शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा आढावा सातत्याने घेत असताना त्यांना शिक्षणाची गुणवत्ता कमी असल्याचे समजले. आपल्या गावातील मुले शिक्षणात कमी असल्याचे त्यांना जाणवले.