सोलापूर- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील नदी पत्रात शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावरील कपड्यांवर असलेल्या टेलरच्या टॅगवरुन पोलीसांनी चोवीस तासांत आरोपींचा छडा लावून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पकडलेल्या चार आरोपींपैकी तिघे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील असून एकाला सोलापूरमधील अक्कलकोट येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
मृतदेहाच्या कपड्यांवरील टेलरच्या पत्त्यावरून पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सैपन उर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय 22 वर्ष, रा.हिरोळी, ता आळंद, जि. कलबुर्गी,कर्नाटक), अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22 वर्ष, रा, हिरोळी, ता आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक), वाघेश इरण्णा हणमशेट्टी (वय 30 वर्ष, रा. हिरोळी, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक), संजयकुमार हिरू राठोड (वय 27 वर्ष, रा नगरतांडा, दुधनी, ता अक्कलकोट, जि सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
टेलरच्या टॅगवरुन आरोपींपर्यंत पोहोचले पोलीस
मयत मलप्पा नागप्पा सुणगार (वय 35 वर्ष, रा हिरोळी, ता आळंद, जि कलबुर्गी, कर्नाटक) हा 2 ऑक्टोबर रोजी भजन ऐकण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. मलप्पा घरी परत आला नाही तेव्हा कुटुंबीयांनी दोन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी मादन हिप्परगा गावातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मलप्पा सूणगार हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती.
शुक्रवारी (9 ऑक्टोबर) अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील नदी पात्रात एका पोत्यामध्ये हाथपाय बांधलेल्या आवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सडलेल्या आवस्थेतील मृतदेह नदी मधून बाहेर काढला. मृतदेहाचे कपडे व त्यावरील टेलरच्या टॅगवरुन मृत व्यक्ती कोण आहे याचा पोलिसांनी शोध लावला. टेलरने दिलेल्या माहितीवरुन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची माहिती समोर आली.
पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका संशयित आरोपीस दुधनी येथून अटक केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व इतर तीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब 9 ऑक्टोबरच्या रात्रीच कर्नाटकातील आळंद तालुक्यातील हिरोळी येथून तिन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
या तपासामध्ये पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहायक फौजदार युसूफ शेख, हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, विपीन सुरवसे, नाईक प्रवीण वाळके, कॉन्स्टेबल महेश कुंभार, बशीर शेख, दूधभाते यांनी आरोपींना चोवीस तासांत अटक केली आहे.