सोलापूर -मार्केट यार्डातील किराणा भुसार मालाचे व्यापारी राहुल विजयकुमार पंपटवार (वय 45 रा. पद्मश्री अपार्टमेंट, जुना पूणे नाका, सोलापूर) यांच्या दुचाकी वाहनातून दोन अज्ञात चोरट्यानी 2 लाख 57 हजार रुपयांची रोखड लंपास केली आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी मार्केट यार्डातील एका व्यापाराला अपघाताचा बनाव करत 4 लाख रुपये लुटले होते. त्या चोरट्याचा तपास अजून लागला नाही तो पर्यंत पुन्हा मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याची रोखड लंपास झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
किराणा होलसेलर दुकानदाराची अडीच लाखांची रोखड लंपास -
सोलापूर मार्केट यार्डात राहुल पंपटवार यांचे साई ट्रेडिंग या नावाचे किराणा भुसार होलसेल दुकान आहे. दुकानातील दिवसभराची रक्कम आणि दोन ते तीन दिवसांची रक्कम घेऊन ते 16 डिसेंबर रोजी मार्केट यार्डातून घरी गेले होते. अॅक्टिव्हा या दुचाकीवरून जुना पुणे नाका येथील घरी गेले होते. दुचाकी वाहनाच्या डिकीमध्ये त्यांनी पैशाची पिशवी ठेवली होती. दुचाकी वाहन घराजवळील मोकळ्या जागेत पार्क केली आणि ते सिद्धिविनायक एजन्सी या किराणा दुकानात गेले होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहुल दुचाकी जवळ आले असता, त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याचे निर्दशर्नात आले.
मार्केट यार्डातील व्यापारी भीतीच्या वातावरणात -
काही दिवसांपूर्वी बागल या व्यापाऱ्याची 4 लाखांची रोखड लंपास केली होती. हे चोरटे अद्यापही सापडले नाहीत आणि आणखीन एका व्यापाऱ्याची रोख रक्कम लंपास झाली आहे. यामुळे दिवसभरात झालेली कमाई किंवा रोख रक्कम लंपास झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा -बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना कोणी दिली?, अनेक प्रश्न गुलदस्तात
हेही वाचा -पंढरपूर येथे तंटामुक्त अध्यक्षसह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल