सोलापूर : भारतातील महानगरांमध्ये सर्वात जास्त पगाराची पॅकेजेस असतात, असा सर्वत्र समज आहे. मात्र सोलापूर शहराने या बाबतीत दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या टायर 1 शहरांना मागे टाकले आहे. जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या सरासरी वेतन सर्वेक्षण 2023 नुसार, सोलापूर शहरात देशातील सर्वाधिक सरासरी वार्षिक वेतन पॅकेज आहे.
सोलापूरचा देशात पहिला नंबर : सरासरी वेतन सर्वेक्षणानुसार, सोलापुरात वार्षिक सरासरी पगार दरवर्षी 28,10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या स्थानी मुंबई आहे, जिचे वार्षिक वेतन सरासरी 21.17 लाख रुपये आहे. बेंगळुरू 21.01 लाख रुपये पगारासह 3 व्या क्रमांकावर आहे. राज्याचा विचार केल्यास, उत्तर प्रदेशने सर्वाधिक सरासरी वार्षिक पगारासह आघाडी घेतली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.
पुरुष आणि महिलांच्या पगारात लक्षणीय तफावत : जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, भारतातील सामान्य वार्षिक पगार 5 लाख रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी वार्षिक पगार सुमारे 18.91 लाख रुपये आहे. पुरुष आणि महिलांच्या पगारातही लक्षणीय तफावत आहे. पुरुषांना सरासरी १९,५३,०५५, रुपये तर महिलांना सरासरी १५,१६,२९६ रुपये पगार मिळतो.