सोलापूर - आतापर्यंत तरी सोलापुरात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढलेला नाही. तरीही सोलापूर जिल्हा प्रशासन गाफील न राहता अलर्ट आहे. कोरोना’च्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार आहे. संजय गांधी योजनेचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पर्यवेक्षणाखाली या कक्षाचे कामकाज 24x7 सुरू राहणार आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे.
सोलापूर जिल्हा आणि शहर परिसरात ‘कोरोना’ विषाणू संसर्ग याबाबत नागरिकांना काही अडचणी अथवा तक्रार नोंदविण्याची असेल, तर या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३१०१२ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कक्षात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा आणि पुन्हा रात्री दहा ते सकाळी सहा अशी तीन पाळीत हा नियंत्रण कक्ष सुरू राहील. या कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवू नयेत, वेळेपूर्वी कामावर उपस्थित राहावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.