सोलापूर - आपले पूर्वीचे मतदारसंघ सोडून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करणाऱ्या विरोधकांना काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खास अंदाजात टोला लगावला. आजच्या सभेत त्यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी पण आता शिवसेनावासी झालेल्या दिलीप माने आणि अपक्ष महेश कोठे यांना हा टोला लगावलाय.
हेही वाचा -इकडं मान वाकव, तिकडं मान वाकव... स्वाभीमान कसला ही तर लाचारी - उद्धव ठाकरे
2014 ला दिलीप माने सोलापूर दक्षिण तर 2009 ला महेश कोठे शहर उत्तरमधून पराभूत झाले आहेत. पण आता हे दोन्ही उमेदवार पक्षांतर करून आमदार प्रणिती नेतृत्व करत असलेल्या मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे हा धागा पकडून प्रणिती यांनी स्वतःच्या मतदारसंघात लढायची हिम्मत नसणारे विरोधक आता आपल्या मुळावर कसे उठलेत हे सांगताना. 'मेरे आंगणे में तुम्हारा क्या काम है'? असा सवाल केला. त्यामुळे सभास्थानी एकच हशा पिकला.
शिवसेनेकडून लढणारे दिलीप माने आणि अपक्ष लढणारे महेश कोठे हे पूर्वाश्रमीचे सुशीलकुमार शिंदे समर्थक आहेत. पण आता प्रणितींना विरोध करीत आहेत. याचाच त्रागा प्रणिती यांच्या भाषणातून समोर येत आहे.