सोलापूर - अवैध धंद्याविरोधात कडक मोहीम सोलापूर शहर पोलिसानी हाती घेतली आहे. त्यासाठी शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरवासीयांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर शहर अवैध धंदे मुक्त करण्याचा निर्धार सोलापूर शहर पोलिसानी घेतला आहे. लॉकडाऊननंतर अनेक अवैध धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहेत. या अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस नवा प्लॅन आखत आहेत. मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपली 'मन की बात' सांगून टाकली आहे.
सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे बोलताना... लॉकडाऊनच्या विश्रांतीनंतर अनेक खासगी सावकारांचा त्रास सुरू झाला आहे. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अमोल जगताप कुटुंब संपले. याविरोधात शहरातील खासगी सावकारांच्या मुसक्या अवळण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. तसेच सहायक उपनिंबधक अधिकारी किंवा डीडीआर विभाग सतर्क झाले आहे. कोणत्याही खासगी सावकाराचा त्रास मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असेल तर त्यांनी तक्रार दाखल करावी, त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
तसेच सोलापुरमध्ये धुमाकूळ घातलेल्या अवैध मटका धंद्याविरोधात कठोर कारवाई करणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देखील यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी माहीत असलेल्या बेकायदेशीर धंद्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात यावी, व त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
खासगी सावाकारांमुळे अनेक जीव जात आहेत. तसेच मटका व्यवसायामुळे अनेकांची संसार उध्वस्त होत आहेत. खासगी सावकार व मटका बुकीचा पूर्णतः बिमोड करण्याचे कार्य पोलीस करत आहेत. यासाठी जनतेचे सहकार्य देखील महत्वाचे आहे. त्यासाठी सोलापूर मधील जनतेने पोलिसांना सहकार्य करून अवैध धंद्याविरोधात असलेल्या कारवाईत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
पोलीस आयुक्तांची 'मन की बात' -
सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कोणतीही पत्रकार परिषद आयोजित न करता किंवा माध्यमांना समोरे न जाता मंगळवारी सायंकाळी एका व्हिडियो मार्फत अवैध धंद्याविषयी माहिती द्या, असे आवाहन केले आहे. एक प्रकारे 'मन की बात' त्यांनी सांगितली आहे. म्हणजे कोणत्याही प्रश्नाला सामोरे न जाता आपले आवाहन घोषित केले आहे.
मंगळवारी सकाळी माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सोलापूरात वाढलेल्या अवैध धंद्याविरोधात एक लाख सह्या घेऊन मुख्यमंत्री व राज्यपालांना निवेदन देणार आहोत. लगेच मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आवाहन करत सांगितले की, अवैध धंद्याविरोधात नागरिकांनो पुढे येऊन संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्या. कारवाई करू, असे आवाहन केले आहे.