सोलापूर -शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहेत. पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे सोलापुरात बेडची संख्या अपुरी पडत आहे,अशी चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात बेडची संख्या मुबलक आहे. रुग्णांनी केवळ एकाच हॉस्पिटलचा आग्रह धरू नये. मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे आणि लवकर बरे होऊन घरी जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. नियोजन भवन येथे वाढत्या कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.
'नागरीक बेडसाठी हट्ट करत आहेत'
शहर आणि जिल्ह्यात टेस्टिंग वाढविल्याने नव्याने रुग्ण वाढू लागले आहेत. ज्यांचा अहवाल पॉजीटिव्ह येत आहे, असे रुग्ण विशिष्ट हॉस्पिटलमध्येच उपचार व्हावे किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतो असे हट्ट करत आहेत. त्यामुळे विशिष्ट रुग्णालयात बेड अपूर्ण पडत आहेत आणि दुसरीकडे मात्र बेड रिकामे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.