सोलापूर Solapur Bus Accident : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे सहाच्या सुमारास धावत्या एसटी बसचा जॉईंट तुटल्यानं चाकं निखळून अपघात झाला. या अपघातात सोलापूर डेपोमधून नांदेडकडं रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत हा अपघात झाला आहे. जॉईंट तुटून एसटीचं चाकं बाजूला रस्त्यावर पडलं आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्यानं एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी दाखल : नांदेड डेपोची एसटी बस काही प्रवाशांना घेऊन सोलापूर डेपोमधून रविवारी पहाटेच्या सुमारास निघाली होती. जॉईंट तुटल्यानं धावती एसटी बस पलटी होऊन थांबली. अपघाताची भीषणता मोठी असून धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवानं यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
लोखंडी जॉईंट तुटल्यानं एसटी बस पलटी :सोलापूर डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदेडकडं रवाना झाली होती. एसटी बसमधून जवळपास 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहराजवळ असलेल्या उळे-कासेगाव इथं अचानक एसटी बसचा लोखंडी जॉईंट तुटला आणि चाक निखळलं. जॉईंट तुटल्यानं धावती एसटी बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला. धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.