सोलापूर Solapur accident news : करमाळा तालुक्यात कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. प्रवासी साखरझोपेत असतानाच चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील रहिवाशी होते.
- कंटेनर आणि चारचाकीचा अपघात एवढा भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय-५६, गुलबर्गा),शशिकला श्रीशैल कुंभार (वय-५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय-३८, बागलकोट) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर शारदा दिपक हिरेमठ (वय-७०, हुबळी) यांचा करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
भाविकांच्या वाहनाची आणि कंटेनरची समोरासमोर धडक-पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील भाविक शिर्डी येथील साईच्या दर्शनासाठी निघाले होते. आज पहाटेच्या सुमारास करमाळा तालुक्यातील सालसे गावाकडून तवेरानं ( गाडी क्र. के.ए. ३२- एन. ०६३१) शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर ( वाहन क्रमांक आर.जे. ०६ जी.सी. २४८६) हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसे गावाच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावणे सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. पांडे गावच्या युवकांनी बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.