सोलापूर - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तळे हिप्परगा येथील पालावर राहणाऱ्या कुटूंबाची गेल्या दोन दिवसापासून उपासमार होत असल्याची बाब उघड झाल्याने खळबळ उडाली. या कुटुंबांना विविध सामाजिक संघटनेकडून अन्नदान करण्यात आले.
पालावरच्या भटक्या कुटुंबाची दोन दिवसापासून उपासमार, 'असा' पोहोचला मदतीचा 'हात' - Corona Virus
तळे हिप्परगे येथे मागील चार महिन्यापासून 100 भटके कुटुंब राहण्यास आहे. मात्र संचारबंदीत या कुटुंबाची उपासमार होत आहे. या कुटुंबांना विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
तळे हिप्परगा येथे मागील चार महिन्यापासून हे भटके कुटुंब राहण्यास आहे. घरोघर भिक्षा मागून या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. याबाबत सोलापुरातील प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्याने भटक्या विमुक्तांची उपासमार सर्वांसमोर आली. सोलापुरातील प्रसारमाध्यमे, मंत्रीचंडक सोसायटी आणि आर. पी. ग्रुपकडून तळे हिप्परगा येथील या भटक्या 100 कुटुंबाना अन्नदान करण्यात आले आहे.
शहर परिसरात भिक्षा आणि शीळे अन्न मागून या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. कुडमुडवाले, वासुदेव, आदी जमातीचे लोकं या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी आले आहेत. बीड, परळी वैजनाथ या भागातून प्रामुख्याने हे कुटुंब तळे हिप्परगा येथे वास्तव्यास आहेत. पालाबाहेर जाण्यास शासनाचा मज्जाव आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत होती. त्याचा विचार करून सामाजिक संघटनांनी येथे अन्नदानाची मदत पुरवली आहे.