सोलापूर - शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना तपासणीची सक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडई येथील भाजी विक्रेते यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती. आज सोमवारी शहरातील 350 भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 18 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच यापुढे भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात अजून कोरोनाची तपासणी करून घ्यावे व चाचणी केल्याशिवाय भाजी विकू नये, असा आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आहे.
भाजी विक्री करताना कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक -
शहरातील भाजी मंडई येथील विक्रेत्यांनी भाजी किंवा फळे विकताना आपल्या जवळ कोरोना निगेटिव्ह अहवाल जवळ ठेवणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तसेच सर्व दुकानदार व व्यापारी यांनी पुढील एका आठवड्यात कोरोनाची तपासणी प्रायव्हेट लॅबकडून करून घ्यावे त्याचा निगेटिव्ह अहवाल आपल्या दुकानात ठेवावा. तपासणी अहवाल न आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येणार आहे.
बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी होणार -
सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सोलापुरात बाहेरगावी वरून येणाऱ्या प्रवाशांचा 72 तास अगोदर असलेला रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.