सोलापूर- महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना 1 सप्टेंबरपासून स्वच्छता उपकर म्हणून 50 रुपये लावला जाणार आहे. त्या विरोधात सिटूच्या वतीने शनिवारी 5 सप्टेंबर रोजी घरोघरी जात, गल्ली बोळामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम व सिटूचे अॅड एम. एच. शेख यांनी महापालिका विरोधात जोरदार निदर्शने करत या उपकराविरोधात जोरदार भाषण करत विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यात नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
आधीच लॉकडाऊनमुळे शहरवासियांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांची रोजगार गेले आहेत. हातामध्ये पैसा नाही. उत्पन्न बुडाले आहे. त्यात सोलापूर महानगरपालिका स्वच्छता उपकर म्हणून अधिकचे 50 रुपये वसूल करण्याच्या तयारीत आहे. 1 सप्टेंबरपासून शहरातील नागरिकांना स्वच्छता उपकरचे भुर्दंड सोसावे लागणार आहे. वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिका सोलापुरातील नागरिकांकडून दरवर्षी विविध मार्गाने कर वसुली करते, त्यामध्ये स्वच्छता कर असताना देखील अधिकचे 50 रुपये कुठून द्यायचे, असा सवाल माजी आमदार आडम यांनी उपस्थित करून शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना उद्देशून भाषण केले.