पंढरपूर- हिंदू संस्कृतीमध्ये नव वधू साठी हिरव्या चुड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चुड्यातूनच नववधूचा शृंगार दिसून येतो. हिंदू परंपरेनुसार हिरवा रंग हा समृद्धी व ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. यातून नववधूच्या रूपाने घरात समृद्धी येते, अशी लोकांची धारणा आहे. लग्न सोहळ्यादरम्यान हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरण्याची पद्धत आहे. त्याला सौभाग्याच लेणं असेही म्हटले जाते. याला महाराष्ट्रामध्ये वधूच्या बांगड्यांना लग्न चुडा असेही म्हणतात, अशी माहिती सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे अध्यक्ष भारत छगन कोकीळ यांनी दिली आहे.
परंपरेनुसार हिरव्या चुड्याची अख्यायिका...
शेकडो वर्षापासून हिंदू धर्मामध्ये लग्न समारंभामध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष असे स्थान आहे. यामध्ये तुळशी चुडा म्हणून नववधूसाठी वापरण्यात येत असतो. त्यातील वैशिष्ट्येप्रमाणे नववधूसाठी एका हातामध्ये जुळ्याप्रमाणे चुडा भरविला जातो. तर दुसऱ्या हातामध्ये 11 जुळ्या घातल्या जातात. या सर्व हिरव्या चुड्यामध्ये शास्त्रीय कारणही आढळून येते. हिरव्या चुड्यातून नववधूसह महिला वर्गांमध्ये आकर्षण असते. त्यातून महिलांच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. हिरव्या शालूवर हिरवा चुडा महिलांच्या सौंदर्यात फुलवण्याचे काम करत असते.