सोलापूर- लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला आहे. त्यावर जात पडताळणी समितीने दबावाखाली असा निकाल दिला असल्याचा आरोप महास्वामी यांचे वकील संतोष नावकर यांनी केला आहे. तर खासदार महास्वामी यांनी बोगस दाखला दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तत्काळ फेरनिवडणूक घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
सोलापुरातील खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर 2019 लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवत असताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर केला होता. मात्र, विद्यमान खासदार यांनी सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला हा बनावट आहे. खासदार हे लिंगायत असल्यामुळे त्यांनी सादर केलेला दाखला तत्काळ रद्द करावा, अशी तक्रार लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरातून उमेदवार असलेले प्रमोद गायकवाड आणि मिलिंद मुळे यांनी केली होती.