पंढरपूर (सोलापूर) -गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्यातील शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने शाळेचे वर्ग भरवण्यात आले आहेत. पण शाळा सुरू होऊन परत वर्ग भरावेत म्हणून पांडुरंग सायकल क्लबमधील चिमुकल्यांनी श्रीपूर-पंढरपूर-श्रीपूर अशी 79 किलोमीटरची सायकलवारी केली. तसेच, शाळा लवकर सुरु व्हाव्यात म्हणून विठ्ठल चरणी साकडे घातले. तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा व आरोग्य संवर्धनासाठी सायकलिंग महत्वाची आहे, हा संदेश या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना देण्यात आला.
चिमुकल्यांची 79 किलोमीटर सायकलवारी
माळशिरस तालुक्यातील लहान मुलांनी श्रीपूर-पंढरपूर-श्रीपूर सायकलवारी केली. श्रीपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथून ही वारी निघून विठ्ठलवाडी, दसूस मार्गे पंढरपूर येथे सायकल रायडर पोहोचले. या लिटिल चॅम्प सायकल रायडरचे स्वागत श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सोपान कदम, प्रशांत आदमाने, राहुल माने तसेच पंढरपूर सायकल क्लबचे महेश भोसले व चंद्रराव यांनी केले. सायकलिंग करणाऱ्या या बालकांना, रोहन परिचारक यांनी सदिच्छा दिल्या. तसेच सायकल रायडर्सचे कौतुक केले व पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.
नामदेव पायरी येथे विठ्ठल चरणी साकडे
गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने शाळेतील तास सुरू करण्यात आले आहेत. पण शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शाळेतील मौजमजेच्या शिक्षणातील नवीन नवीन पैलू शालेय विद्यार्थ्यांना हरवल्यासारखे वाटत आहेत. श्रीपूर येथील सायकल रायडर्समधील 15 वर्षांच्या चिमुकल्यांनी श्रीपूर ते पंढरपूर अशी सायकलवारी काढून पंढरीतील नामदेव पायरी इथे विठ्ठलाला साकडे घातले. त्यामध्ये त्यांनी 'कोरोना महामारी लवकरात लवकर जाऊ दे, शाळा पूर्वीसारखी सुरू होऊ दे' अशाप्रकारचे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले.