पंढरपूर (सोलापूर) -श्री विठ्ठल-रुक्मिणी चंदन उटी पूजेचा सांगता सोहळा पार पडला. मंदिर समितीकडून चंदन उटी पूजेच्या समाप्ती निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्याला मोगरा व गुलाबाच्या फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्यातर्फे होती.
13 एप्रिलपासून चंदन उटी पूजेची सुरुवात
मंदिर समितीकडून रणरणत्या उन्हात विठ्ठल-रुक्मिणीला थंडावा मिळावा यासाठी 13 एप्रिलपासून चंदन उटी पूजेची सुरुवात करण्यात आली होती. 2 महिन्यापासून विठ्ठल व रुक्मिणीला चंदनाचा लेप देऊन पूजा केली जात होती. चंदन उटी पूजाही मृग नक्षत्र लागल्यानंतर सांगता करण्याची परंपरा आहे. मात्र, मंदिर कोरोनामुळे बंद असले तरी मंदिर समितीकडून परंपरेनुसार ही पूजा करण्यात आली. मंदिर समितीचे कर्मचारी सचिन देशपांडे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची, तर महेश जिंतीकर यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.