सोलापूर- दुष्काळग्रस्त शेतकर्यांना प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली. पंढरपुरातील केबीपी कॉलेज रोड, विठ्ठल रुग्णालयाशेजारी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.
पीक विम्यासाठी शिवसेना सरसावली, सोलापुरात तालुक्याच्या ठिकाणी उभारली मदत केंद्रे - संभाजी शिंदे
पंढरपुरातील केबीपी कॉलेज रोड, विठ्ठल रुग्णालयाशेजारी सुरु करण्यात आलेल्या मदत केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने मदत केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
या मदत केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीकविमा योजना व छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यातील शेतकर्यांनी या मदत केंद्राच्या माध्यमातून अर्ज दाखल करावेत, असे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले आहे.