सोलापूर - पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सेनेच्या वतीने सांगण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकट काळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वत्र शेतकरी मदत केंद्रांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पंढरपुरात सेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केबीपी कॉलेज रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, अखेरच्या टप्प्यातील पिकांना याचा फटका बसल्याचे सेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी मदत केंद्र सुरू केल्याचे ते म्हणाले.