सोलापूर - अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले दशरथ कसबे व शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जाधव या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे .न्यायाधीश जाहेदा मिस्त्री यांनी हा निर्णय सोमवारी (दि. 27 जुलै) सुनावला आहे.
दोघाआरोपींचा पोलीस कोठडीचा काळ संपल्याने सोमवारी गुन्हे शाखेने आरोपींना न्यायलयात हजर केले होते. त्यावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शिवसेना नगरसेवक लक्ष्मण जाधव व दशरथ कसबे यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अॅड. इस्माईल शेख यांनी माहिती दिली.
13 जुलैला अमोल जगताप या ऑर्केस्ट्रा बार चालकाने राहत्या घरी पत्नी मयुरी जगताप, दोन मुले आदित्य व आयुष यांना ठार करत आत्महत्या केली होती. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अमोल जगताप यांनी एक चिट्ठी लिहिली होती. त्या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी तपास करत 5 आरोपींना अटक केले आहे.
अमोल जगताप यांनी आत्महत्या केल्याच्या दिवसापासून आजतागायत वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपीना अटक करण्यात आले आहे. त्यामध्ये व्यंकटेश दम्बलदिनी, सिद्धराम बिराजदार, दिनेशकुमार बिराजदार, नगरसेवक लक्ष्मण जाधव, दशरथ कसबे यांना अटक केली होती.
यापूर्वी गुन्हे शाखेने दशरथ कसबे व शिवसेना नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपणार होती. यासाठी दोघांना न्यायालयात न्यायाधीश जाहेदा मिस्त्री यांच्या समोर उभे केले होते. गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात म्हणणे मांडताना सांगितले की, आरोपीचे चारचाकी वाहन जप्त करायचे आहे. तसेच या दोन आरोपींच्या संपर्कातील कुणाल अंबादास गायकवाड,अरविंद जाधव, दशरथ जाधव यांना अटक करायची आहे. आरोपींच्या वकिलांनी याबाबत हरकत घेतली.
जवळपास दीड कोटींचे कर्ज
अमोल जगताप हे पुणे-सोलापूर महामार्गावर गॅलेक्सी नावाचे ऑर्केस्ट्रा बार चालवत होते. त्यांना मोठे कर्ज झाले होते. व्यंकटेश दम्बलदिनी याकडून 70 लाख रुपये 3 टक्के व्याजाने घेतले होते. सिद्धाराम बिराजदार व दिनेशकुमार बिराजदार यांकडून अनुक्रमे 15 लाख व 4 लाख रुपयांचे कर्ज 15 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. तर शिवसेना नगरसेवक लक्ष्मण जाधव व दशरथ कसबे या दोघांकडून एकूण किती रक्कम व्याजाने अमोल जगताप यांनी घेतली होती. याचा तपास सुरू आहे. जवळपास दीड कोटींचे कर्ज अमोल जगताप यांना खासगी सावकारांनी दिले होते. या कर्जामधून अमोल यांचे घर, शेती, हॉटेल सर्वकाही गेले होते. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलत त्यांनी संपूर्ण कुटुंबच संपविले.