सोलापूर -राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगतरित्या टार्गेट केले तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये त्यांचे अंगण आणि आमचे रणांगण असे आंदोलन शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजपला दिला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला आहे.
'तुमचे अंगण आमचे रणांगण', सोलापुरातील शिवसैनिकांचा भाजपला इशारा - सोलापूर शिवसेना
सोलापुरात सरकारच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत भाजपच्यावतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपने पुकारलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या वतीने ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ आंदोलन केले. शिवसैनिकांनी भगवा झेंडा, भगवा रुमाल फडकावून ठाकरे सरकारला समर्थन दर्शविले आहे.
सोलापूर शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. दोन्ही माजी मंत्री आहेत. सोलापूर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे, अशा परिस्थितीत सोलापुरातील भाजपला आंदोलन करताना लाज वाटत नाही का? असा सवालही शिवसेनेच्यावतीने विचारण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. त्यावेळी सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या, दिवे लावले. आम्ही त्यावेळी देशाच्या पंतप्रधानाच्या बाजूने होतो. मात्र, भाजपवाले हे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत टार्गेट केले तर, तुमचे अंगण आणि आमचे रणांगण हे आंदोलन करण्याचा इशारा सोलापुरातील शिवसैनिकांनी दिला.