पंढरपूर (सोलापूर) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे पंढरपुरात आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचेही आगमन झाले आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, उत्तम जानकर राजन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. आमदार भारत नाना भालके यांच्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी सरकोली येथे पवार दाखल आहेत. आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली आणि ते उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती पवार यांना कळाली. तेव्हा त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भालके यांची विचारपूस केली होती.
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले. त्यांच्या अकाली निधनाने भालके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भालके पवारांना वडिलांसमान मानत
आमदार भालके यांना शरद पवार यांचे शिष्य मानले जात होते. आमदार भालके हे पवारांना आपल्या वडिलांसमान मानत असत. हे अनेकदा त्यांनी जाहीर सभांमधून, भाषणांमधून व्यक्त देखील केले. २०१३ साली संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार सरकोली येथे आमदार भारत भालके यांच्या घरी आले होते.