सोलापूर (पंढरपूर) - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी आठवले यांची खिल्ली उडवली. शरद पवारांनी एनडीएसोबत यावे त्यांना जास्त चांगले पद मिळेल, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपकआबा साळुंखे उपस्थित होते.
खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी पवारांनी मारली. देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या. मात्र, त्यांचा तपासाची दिशा भरकटल्याचे दिसत आहे, असे ते म्हणाले.