सोलापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोलापूर शहरातील बैठक सुरू झाली आहे. शरद पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचेही नेते उपस्थित आहेत. शहरातील रामलाल चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये ही बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीमध्ये शरद पवार सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.
शरद पवारांच्या या बैठकीला पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके, सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतः शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या जागेवर काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणार आहेत. २००९ ची लोकसभा निवडणूक शरद पवार यांनी माढ्यातून तर सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांनी लढवली होती.