सोलापूर -राज्यात विविध पक्षांनी राज्यभर आपल्या वेगवेगळ्या यात्रा काढल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले आहेत. आज मंगळवारी ते जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांची चर्चा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आजपर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. तर जे येणार आहेत त्याची विचार करा, असे सांगत पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांनी कष्ट केले, मेहनत केली त्यांनी इतिहास बदलला. मात्र, आज तो इतिहास घडवण्याऐवजी काही लोक दिल्ली दारी सुभेदारी करणे पसंद करत आहेत, अशी टीका त्यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'मी साहेबांचा' नावाची टोप्या घालून जल्लोष केला.