महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

या वयात पाय आणि मांड्या पहायची वेळ येऊ देऊ नका; शरद पवारांची मोहिते पाटलांवर टीका

काहीही करा पण हाफ पॅन्ट हाफ शर्ट आणि डोक्यावर काळी टोपीच्या पेहरावात आमच्यावर पाय आणि मांड्या पाहायची वेळ येऊ देऊ नका

शरद पवारांची मोहिते पाटलांवर टीका

By

Published : Apr 20, 2019, 9:57 AM IST

सोलापूर- या वयात तुमच्या मांड्या आणि पाय पाहण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली. विजय दादा तुम्ही आमचे सहकारी होतात, त्यामुळे काहीही करा पण हाफ पॅन्ट हाफ शर्ट आणि डोक्यावर काळी टोपीच्या पेहरावात आमच्यावर पाय आणि मांड्या पाहायची वेळ येऊ देऊ नका, अशी टीका करत रणजितसिंह मोहिते पाटलांचाही पवार यांनी समाचार घेतला.

शरद पवारांची मोहिते पाटलांवर टीका

विजयसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेस विचाराचे आहेत. मात्र, त्यांची पुढची पिढी सत्तेसाठी भाजपच्या दारात जाऊन उभी राहिली आणि आता विजय दादादेखील भाजपच्या व्यासपीठावर गेले आहेत. भाजप हा खूप शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे भविष्यात विजयदादांना हाफ पॅन्ट हाफ शर्ट आणि काळी टोपी घालून आम्हाला पाय आणि मांड्या पाहायची वेळ येऊ देऊ नका, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

विजयदादा तुम्ही काँग्रेसच्या विचाराची माणसं आहात. शंकरराव मोहिते-पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठेने काम केले. त्यानंतर विजयदादांनी काँग्रेसचा विचार घेऊन काम केले. मात्र, आता त्यांची पुढची पिढी ही भाजपच्या दावणीला जाऊन बसली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली होती, ती मात्र त्यांना त्यांच्या मुलासाठी उमेदवारी पाहिजे होती. आम्ही याला नकार देताच रणजितसिंह मोहिते-पाटील हे गिरीश महाजन यांच्या दारासमोर जाऊन उभे राहिले होते. तर मुख्यमंत्र्याच्या दारावरही चकरा मारत होते. माझ्या पक्षातील उपमुख्यमंत्रीपदी राहिलेल्या मोहिते-पाटलांच्या मुलाने कुण्या एका मंत्र्याच्या दारासमोर चक्रा माराव्यात हा माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमान दुखावणारी गोष्ट आहे. जे मोहिते-पाटील उपमुख्यमंत्री होते यांच्या दारासमोर रांगा लागायच्या त्याच उपमुख्यमंत्री मोहिते- पाटील यांचे चिरंजीव दुसऱ्या मंत्र्याच्या दारात चक्रा मारताना पाहून वाईट वाटले. सत्तेसाठी मोहिते-पाटील यांची पुढची पिढी लाचार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ज्या शंकरराव मोहिते पाटलांनी स्वाभिमानाच्या जोरावर हजारो शेतकरी कामगारांची संसार उभा केले, लोकांना न्याय दिला, त्याच मोहिते-पाटलांची तिसरी पिढीही कुण्या मंत्र्याच्या दारासमोर गिरक्या मारत असेल तर वर असलेल्या शंकरराव मोहिते पाटलांना काय वाटत असेल, अशी भावनिक साद घालत शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर कडाडून टीका केली.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोहिते-पाटील यांना मागेल ती पदे दिली. मंत्रिमंडळातील विविध खाती एवढेच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री पद देखील मोहिते-पाटलांना दिले, असे असतानादेखील मोहिते-पाटील हे भीमा स्थिरीकरण विषय पुढे करत भाजपमध्ये गेले आहेत. मात्र, मोहिते-पाटील हे स्थिरीकरणासाठी नव्हे तर त्यांच्या अडचणीत आलेल्या सहकारी व खासगी संस्थांचे विलीनीकरण व्हावे. यासाठी भाजपमध्ये गेले असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपुते येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी शरद पवार बोलत होते

ABOUT THE AUTHOR

...view details