सोलापूर- लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळविण्यात अपयशी ठरलेले विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी राजकारण हे सरळ माणसाचे काम नाही असे म्हटले आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचा १ लाख ४६ हजार मतांनी पराभव केल्यानंतरही स्थानिक भाजपचे नेते आणि अन्य मंत्र्यांनी केलेल्या विरोधामुळे खासदार बनसोडे यांना तिकीट मिळाले नाही. त्याची सल शरद बनसोडेंच्या मनात राहिली आहे. ती व्यक्त करताना ते 'मी घर जाळून राजकारण केले' असे सांगतात.
सोलापुरात भाजपांतर्गत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे परस्परविरोधी २ कट्टर राजकीय गट आहेत. या २ गटात नेहमी कुरघोड्यांचे राजकारण झालेले सोलापूरकरांनी अनेकदा पाहिले. पण खासदार बनसोडे यांनी नेहमी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. नेमकी हीच गोष्ट बनसोडेंच्या अंगांशी आली. त्यांच्या खासगी जीवनातल्या अनेक गोष्टी सार्वजनिक झाल्या. पुढे त्याच गोष्टींचे राजकारण करण्यात आले. दोन्ही देशमुखांच्या गटांनी खासदार बनसोडे यांचे तिकीट कापण्यात आपली ताकद लावली.