सोलापूर Shantabai Kale Struggle for House : 'कोल्हाट्याचं पोर' या पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या मातोश्री व प्रसिद्ध लावणी कलावंत शांताबाई काळे यांची घरासाठीची परवड अजूनही सुरूच आहे. अनेकदा प्रयत्न करूनही त्या घरापासून आजतागायत वंचितच आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत त्यांनी प्रयत्न करून पाहिले, मात्र कुणीही त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही. फेब्रुवारी महिन्यात प्रहार संघटनेचे बच्चू कडूंनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते अजूनही आश्वासनच राहिलंय. शांताबाई काळे या सध्या भाड्याच्या घरात राहून आयुष्य जगत आहेत. मला फक्त घराची अपेक्षा आहे, बच्चू कडू किंवा शासन कोणीही मला घर बांधून द्यावं, असं आर्जव शांताबाई काळे करतायत.
पत्रकार परिषदेत शांताबाई काळेंच्या घराबाबत विचारला होता प्रश्न : 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी सातरस्ता येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांताबाई काळेंना करमाळा तालुक्यातील नेरळे गावात घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर पत्रकारांनी शांताबाई काळेंना घर बांधून दिलं नाही. त्या आजतागायत भटकंती करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा घर बांधून देण्याचं आश्वासन दिलंय. यावर शांताबाई काळेंनी खुलासा करत काही गैरसमज झाला असेल, पण मला आजही बच्चू कडूंकडून घराची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलंय.