पंढरपूर :शिवसेना नेत्या शैलजा गोडसे यांनीपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बंडखोरी केल्याने शैलजा गोडसे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महिला जिल्हा संघटक शैलजा गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्याविरुद्ध अपक्ष शैलजा गोडसे
शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख शैलजा गोडसे यांनी पंढरपूर व मंगळवेढा शहरातून शक्ती प्रदर्शन केले. नंतर अपक्ष उमेदवारीचा अर्ज पंढरपूर येथील प्रांत कार्यालयात दाखल केला. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत शैलजा गोडसे जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये पक्ष उभारणीस त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र पोटनिवडणुकीत पक्षाचा आदेश नसतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याचा फटका महा विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना बसण्याची शक्यता आहे. आता भगीरथ भालके आणि शैलजा गोडसे यांची लढाई होणार आहे.