महाराष्ट्र

maharashtra

पुणे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण, सोलापुरात आरोपीला अटक

By

Published : May 19, 2021, 9:19 PM IST

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या आरोपीला सोलापुरात अटक करण्यात आली. सीसीटीएनएस आणि आयसीजेएस या तांत्रिक पद्धतीचा उपयोग करून संशयित आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. शाहरुख सिकंदर शेख असे त्या आरोपीचे नाव आहे.

solapur
सोलापूर

सोलापूर -पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या आरोपीला सोलापुरात अटक करण्यात आली. सीसीटीएनएस आणि आयसीजेएस या तांत्रिक पद्धतीचा उपयोग करून संशयित आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपीचे नाव शाहरुख सिकंदर शेख (रा. पुणे) असे आहे. तो पुणे येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून अक्कलकोटकडे घेऊन जात होता. पण नाकाबंदी दरम्यान सोलापुरातील वळसंग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर, आरोपीच्या ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

बोलताना चाचपडल्याने संशय बळावला

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नाकाबंदीची ड्युटी बजावत होते. त्यावेळी अक्कलकोटकडे निघालेल्या संशयित व्यक्तिची वळसंग टोल नाक्यावर थांबवून पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी संशयित शाहरुख शेख उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसेच, त्याच्यासोबत एक मुलगी होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस त्याला ओळखपत्र मागू लागले. त्याच्या ओळखपत्रावरून शाहरुख सिकंदर शेख असे त्याचे नाव असल्याचे कळाले. त्याची अधिक माहिती घेतली असता तो बोलताना चाचपडला यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला.

सीसीटीएनएस आणि आयसीजेएस प्रणालीद्वारे आरोपीचा शोध

वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल भोसले यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळवली. त्यासाठी पोलीस हवलदार इक्बाल शेख, महिला पोलीस शिपाई कविता बिराजदार, सीसीटीएनएस विभाग यांच्याकडून सीसीटीएनएस (गुन्हे व गुन्हेगार जाल मागोवा यंत्रणा. CCTNS- Crime and Criminal Tracking Network and System) व आयसीजेएस (आंतर परिचालन गुन्हेगारी न्याय प्रणाली. ICJS- Interoperable Criminal Justice System) या केंद्रीय गृह विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या शोध प्रणालीतून अधिक माहिती घेतली. त्या माहितीमध्ये संबंधित शाहरुख शेखवर 15 मे 2021 रोजी भादवि ३६३ प्रमाणे शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब शिरूर पोलीस ठाण्याला माहिती कळविली. शिरूर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांनी रात्री उशिरा सोलापुरात येऊन दोघांनाही ताब्यात घेतले. शाहरुख शेख हा संशयित आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांना इतर गुन्ह्यातही हवा असलेला आरोपी होता.

दरम्यान, एएपीआय अतुल भोसले, पोलीस हवालदार इक्बाल शेख, पोलीस शिपाई प्रमोद गायकवाड, गणेश पाटील, कविता बिराजदार यांनी अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हेही वाचा -नागपूर : भरधाव इनोव्हाची ई-रिक्षाला धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details