पंढरपूर (सोलापूर) -शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पंढरपुरात दिली. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल येथे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार पाटील सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आमदार जयंत पाटील याबाबत बोलताना प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू -
सांगोला मतदारसंघाचे अकरा वेळा प्रतिनिधित्त्व करणारे माजी आमदार गणपत आबा देशमुख हे महिन्याभरापासून आजारी आहेत. मात्र, गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये मंगळवारपासून चढ उतार सुरू आहेत.
आमदार गणपतराव देशमुख हे सलग 55 वर्षे सांगोला विधानसभेचे आमदार होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद करण्यात आली आहे. 1977 साली गणपतरावांची महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते वर्णी लागली होती. तसेच 1978 च्या शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच 1999च्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गणपत आबा देशमुख यांनी काम केले आहे.
हेही वाचा -भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली