सोलापूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खते पुरविण्यात येतील, अशी घोषणा शासनाने केली होती. शासनाने घोषणा केल्यानंतर काही मोजक्याच शेतकऱ्यांना बी-बियाणे बांधावर मिळाले आहेत. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे पोहोचलेच नाही. शिवाय दुकानात देखील बियाणे आणि खते उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता पाऊस तर झाला. पण, पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मिळावेत यासाठी कृषी विभाग हा सज्ज असून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बियाणे आणि खतं उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली होती. काही ठराविक शेतकऱ्यांना बांधावर बियाणे मिळाले देखील मात्र ही संख्या खूपच नगण्य आहे. अनेक शेतकरी हे बियाण्यांसाठी वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांना बांधावर, तर सोडाच पण दुकानात देखील बियाणे आणि खते मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे गेले आहे की ऑफिसमध्ये आहे की मंत्रालयात बियाणे गेले आहे? हे एकदा तपासून पाहा, असा संतप्त सवाल देखील शेतकरी ज्ञानदेव जाधव यांनी उपस्थित केला आहे.
बांधावर बियाणे, खतं पोहोचलेच नाही, दुकानातही उपलब्ध नाही; पाऊस पडूनही आम्ही पेरावं की नाही? जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे. मात्र, सोयाबीन बी बाजारात उपलब्ध नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास या गावातील ज्येष्ठ शेतकरी ज्ञानदेव दत्तू जाधव हे सोयाबीनचे बियाणे मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकारने बांधावर बियाणे मिळेल, असे सांगितले आहे. शेतकऱ्यांना बांधावर बियाणे दिल्याचा दावा देखील कृषी विभाग करत आहे. मात्र, आम्हाला तर बांधावरच काय, तर दुकानात देखील बियाणे मिळत नसल्याचे ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.
...मग आम्ही पेरावं की नाही? -
उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावातील अहमद रसूल शेख हा शेतकरी देखील बियाण्यांची बांधावर वाट पाहत आहे. मात्र, त्यांना अजूनही बांधावर बियाणे किंवा खतं मिळालेली नाहीत. शेतकरी गटामध्ये त्यांनी नाव नोंदणी केली आहे. शेतकरी गटाने त्यांना कोणते बियाणे लागणार आहेत? याची नोंदणी केली. मात्र, आता पेरणी करायची वेळ आली आहे, तरी देखील बियाणे मिळाले नाही. 'माझी सात एकर शेती आहे. या सात एकरामध्ये दोन एकर सोयाबीन, दोन एकर तुरी आणि दोन एकर मूग पेरायचा होता. पेरणीची सगळी तयारी झालेली आहे. मात्र, बियाणे उपलब्ध होत नाही. कृषी खाते सांगते, की शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बियाणे मिळतील. मात्र, मला अजून कोणतीही बियाणे मिळालेले नाही. शेतकरी गटामध्ये मी नाव नोंदणी केली. पण, अजून तरी त्यांच्याकडूनही काहीही सांगण्यात आले नाही. मी बाजारात कृषी केंद्रावरून बियाण्याची विचारपूस केली, तर तिथे देखील बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगतात. सोयाबीनचे महादेवचे बियाणे मागितले, तर ते उपलब्ध नाही. दुसऱ्या बियाण्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा सांगितल्या जातात. मग आम्ही पेरावं की नाही?' असा सवाल रसूल या शेतकऱ्याने उपस्थित केला.