पंढरपूर- वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची माघ वारी यात्रा 22 ते 23 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आला नाही. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाकडून दोन दिवसाचा संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पंढरपूर येथील विठुरायाची आषाढी, कार्तिकी यात्रा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली होती. त्यातूनच माघी वारीमध्ये भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये होऊ नये, म्हणून 22 ते 23 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडून दोन दिवसाच्या संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पोलिसांकडून माघी वारी दरम्यान पंढरपुरात राज्यातील भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आव्हान करण्यात आले आहे. तर पंढरपूरवासियांनीही याबाबतीत सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.