सोलापूर -कोरोनाची आलेली दुसरी लाट ही अतिशय भयंकर आहे. याची लक्षणेदेखील अतिशय घातक आहेत. नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्यास भूक न लागणे, थकवा येणे, डोळे लाल होणे, पोटदुखी, जुलाब असे लक्षणे आहेत. पूर्वीचा कोरोना लाटेत संपर्कात आलेल्या दोन ते चार जणांना लागण होत होती. परंतु सध्या पसरलेल्या दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूमुळे कमीत कमी दहा जणांना याची लागण होत असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे. आज दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रेमडेसिवीरमुळे लिव्हर आणि किडनीवर परिणाम -
एखाद्या रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली असल्यास ताबडतोब त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे हे चुकीचे आहे. कारण रुग्ण जेव्हा माईल्डमधून मॉडरेट या स्टेपमध्ये ज्यावेळी जात असतो, त्यावेळी कोरोना विषाणूची संख्या वाढत असते. त्यावेळी विषाणूची वाढती संख्या रोखण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. पण एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि तो पाहिल्या स्टेपमध्ये आहे, त्यावेळी व्हिटॅमिन सी, मल्टीव्हिटॅमिन्स गोळ्या पाहून रुग्ण बरा होऊ शकतो, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याने पुढे त्या रुग्णांची लिव्हर चाचणी आणि किडनीची चाचणी करावी लागणार आहे.