महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील ४५० गावांमधील ३३५ शाळा सोमवारपासून होणार सुरू! - सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू

सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

solapur district school start
solapur district school start

By

Published : Jul 9, 2021, 10:40 PM IST

Updated : Jul 9, 2021, 10:48 PM IST

सोलापूर -सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे यांनी या सूचना दिल्या आहेत.

नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील शाळा होणार सुरू

8 वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार -

भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ज्या ठिकाणी गेल्या एक महिन्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावात 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. सुरू करण्यात येणाऱ्या शाळांचे सॅनिटायजेशन करून घ्या, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

लसीचे नियोजन करा -

कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे लसीचे नियोजन करा. यापुढे जिल्ह्याला लसींची कमतरता पडणार नाही. ज्यांचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस होतात, त्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचनाही भरणे यांनी दिल्या.

लोकसंख्येच्या प्रमाणात लसी मिळणार -

महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शहराला जादा लस देण्याची मागणी केली आहे. यावर पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, आतापर्यंत शहरात 25 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात 14 टक्के आहे. सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात 30 टक्के लसी तर ग्रामीण भागात 70 टक्के लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

सोलापुरात सद्यस्थितीत असलेली रुग्णांची संख्या -

सध्या सोलापुरात 2397 रूग्ण ग्रामीण भागात तर 94 रुग्ण सोलापूर शहरात असे एकूण 2491 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. माझे मूल माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख 76 हजार बालकांची तपासणी करण्यात आली आहे. 6409 बालकांना चार प्रकारचे आजार असल्याचे आढळून आले आहे. कोविड सदृश 426 बालकांपैकी 56 बालके कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले.तसेच आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 569 रूग्ण आढळून आले असून 415 रूग्ण बरे झाले आहेत. 76 रूग्ण उपचार घेत असून औषधोपचाराची कोणतीही कमतरता नाही. सर्व रूग्णांना मोफत इंजेक्शन दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

Last Updated : Jul 9, 2021, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details