पंढरपूर - पंढरपूर येथे एक वेगळीच शाळा सुरु झाली. शाळेत जाऊन त्या मुलांना मस्त दंगा करता आला, एकत्र डबा खाता आला, सुमारे आठ महिन्यानंतर शाळेत मनसोक्त खेळताही आले, गप्पा मारता आल्या. हे सगळं एकत्र जुळून आलं, ते चंद्रभागेतील पुरामुळे. चंद्रभागेतील पुरामुळे स्थलांतरी कुटुंबातील मुलांनी पंढरपूर येथील लोकमान्य प्रशाळेत एकत्र शाळा भरवली.
अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. नीरा व भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर, काही कुटुंबाची लोकमान्य विद्यालयात सोय करण्यात आली. लोकमान्य शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांची आपल्या मित्रांबरोबर तब्बल सात महिन्यांनंतर भेट झाली. कोरोना महामारीमुळे बंद असलेली शाळा पुरामुळे पुन्हा भरली.