महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानमध्ये गेलेले सत्यवान सात वर्षानंतर घरी परतले, वृद्ध आईला आनंदाश्रू अनावर - पाकिस्तानमध्ये गेलेले सत्यवान सात वर्षानंतर घरी परतले

लऊळ गावच्या हद्दीत श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या सत्यवान हे पत्नी समवेत २०१३ मध्ये दवाखान्यात गेले असता ते तेथून बेपत्ता होते. त्यानंतर ते पाकिस्तानात सापडल्याची माहिती समोर आली. सत्यवान भोंग तब्बल सात वर्षानंतर आपल्या गावी लऊळ येथे पोहेचले आहेत.

पाकिस्तानमध्ये गेलेले सत्यवान सात वर्षानंतर घरी परतले
पाकिस्तानमध्ये गेलेले सत्यवान सात वर्षानंतर घरी परतले

By

Published : Feb 6, 2021, 6:35 PM IST

माढा (सोलापूर) - इतकी वर्ष मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्याची चिंता सतावणाऱ्या ९० वर्षीय आई केसरबाई भोंग यांना मुलगा सत्यवान आल्याचे कळताच त्या गहिवरल्या. मायेने गोंजारत ए सत्यवान कुठं गेलतास सात वरीस.. काय खाल्लंस, कुठं राहिलास रं पोरा.. अशी चौकशी करताना वृध्दापकाळाने अंधत्व आलेल्या केसरबाई गहिवरल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सत्यवान घरी पोहचल्याने आई, भाऊ, पुतण्यासह अन्य नातेवाईक आनंदून गेले.

लऊळ गावच्या हद्दीत श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या सत्यवान हे पत्नी समवेत २०१३ मध्ये दवाखान्यात गेले असता ते तेथून बेपत्ता होते. त्यानंतर ते पाकिस्तानात सापडल्याची माहिती समोर आली. पाकिस्तान प्रशासनाने भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधून पासपोर्ट काढल्यानंतर भारतात पाठवले होते. सत्यवान तीन महिन्यापूर्वी अमृतसर(पंजाब)मध्ये पोहोचले खरे मात्र तीन महिने लोटुन गेले तरीदेखील सत्यवान कुटुंबियांच्या भेटीपासून वंचित राहिले होते. या प्रकरणावरुन शासकीय अनास्थेचे दर्शन घडले.

पाकिस्तानमध्ये गेलेले सत्यवान सात वर्षानंतर घरी परतले

कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, अन्य पोलिस व भोंग यांचे नातेवाईकांनी अमृतसरच्या श्री गुरुनानक संस्थेत जाऊन सत्यवान यांना ताब्यात घेतले. अन् ते गुरुवारी सायंकाळी सत्यवान यांना आपल्या गावी घेऊन आले. महाराष्ट्र प्रशासनाकडून सत्यवान यांना आणण्यासाठी प्रक्रिया जलदगतीने राबवण्याची गरज होती. मात्र तसं काही घडलं नाही. सत्यवान यांना घेऊन आलेले पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांना याबाबतची प्रतिक्रिया विचारली मात्र त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या नकारामुळे त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. कुर्डूवाडी स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोंगरे यांचे कार्यालय गाठले. मात्र तेथे ते उपस्थित नव्हते. त्यांच्याशी अनेकदा फोनद्वारे संपर्कही साधला मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. पोलीस प्रशासनाने प्रसार माध्यमांशी एक प्रकारे या विषयी बोलण्यास अनास्थाच दाखवली.


सत्यवान यांना पाकिस्तानमध्ये कसे पोहोचलात याबाबत अनेकदा विचारणा केली, मात्र ते निरुत्तरच राहिले. राज्याच्या प्रशासनाने त्यांना आणण्यासाठी जलदगतीने प्रकिया राबवली नसल्याची खंत व्यक्त करतानाच दुसरा कुण्या मोठ्या घरची व्यक्ति असती तर प्रशासनाची धावपळ उडाली असती. आमच्या बाबतीत मात्र तसे घडले नसल्याचे सत्यवान यांचे पुतणे गणेश भोंग यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details