महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवारांच्या माघारीनंतर माढ्यातील राजकीय हालचालींना वेग; संजय शिंदेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - ncp

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

संजय शिंदे

By

Published : Mar 13, 2019, 2:57 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने माढ्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माढामधून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली, तर भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढातून उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला विरोध करत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उभे रहावे किंवा माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात यावी, यावर चर्चा झाली.

राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी शक्यता वाटल्यावर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन भाजपकडून लोकसभेची माढ्यातील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. रणजित सिंह भाजपच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत असलेले अध्यक्ष संजय शिंदे यांना मुंबईत बोलावून घेतले. लोकसभेसाठी उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि संजय शिंदे यांच्यात रात्री उशिरा चर्चा झाली.

संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र, मोहिते-पाटील यांना जिल्ह्यांमध्ये प्रबळ विरोधक म्हणून समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपच्या सोबतीने मिळवला. तसेच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवत तिसरी आघाडी देखील समोर आणली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करायचा आणि निवडून आणायचा असेल तर संजय शिंदे आणि त्यांच्या तिसऱ्या आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय माढ्यातील विजय सुकर होणार नाही. याची कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना चर्चेसाठी बोलावले. संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे सध्या तरी त्यांचा लोकसभेसाठी जाण्याचा विचार नाही, मात्र भाजपकडून संजय शिंदे यांना माढा लोकसभा लढवावी, यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details