सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर माढा तालुक्यातील संजय शिंदेच्या विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी माढ्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह माढ्यातील शिंदे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना माढ्यातून लढण्यास नकार दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली. या सगळ्या गोष्टीमुळे राज्याचे मुख्यमंत्री नाराज झाले असून मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. माढा तालुक्यातील संजय शिंदे यांच्या विरोधकांना वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांच्या मागण्या मान्य करत भाजपच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपावरुन माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे हे शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्याची भेट घेतली.