सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माढ्यातून संजय शिंदे, तर उस्मानबादमधून राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी - उमेदवारी
2019-03-22 17:52:28
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिली होती उमेदवारी. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांच्या मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आग्रह होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने या नावाला विरोध केल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याची उत्सुकता लागून राहिली होती.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे घेतले. त्यानंतर त्यांना माढा लोकसभा मतदार संघातून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. शुक्रवारी बारामतीतल्या आप्पासाहेब पवार सभागृहात संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय शिंदे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून आलेले संजय शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले होते. संजय शिंदे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेकडून करमाळा मतदारसंघात विधानसभा लढवली होती. त्यानंतर आता संजय शिंदे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या स्वगृही परतले आहेत.