सोलापूर- कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार बुडाले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र धावून येत आहे. त्याचप्रमाणे सोलापूरच्या माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे या बंधूंनी देखील सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
माढ्यातील राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडून पूरग्रस्तांना लाखोंची मदत; मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट - बबनराव शिंदे
सोलापूरच्या माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे या बंधूंनी सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे संजयमामा शिंदे यांनी पूरग्रस्तांना ११ लाख रुपयांची मदत केली आहे. तर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याकडून १० लाख ४ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला आहे. त्यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी हा निधी जमा केला आहे.
संजय शिंदे आणि आमदार बबनराव शिंदे हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरू आहेत. संजय शिंदे हे आताच्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्याचा पराभव केला होता.